किडनाशके खरेदी करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी
1.पिकांवर रस शोषणाऱ्या किडींसाठी १५ ते २० टक्के झाडांवर व खोड किडे, बोंड अळ्या, पाने पोखरणाऱ्या/गुंडाळणाऱ्या/ खाणाऱ्या अळ्यांचा उपद्रव ५ टक्के पेक्षा जास्त असल्यास रासायनिक किडनाशकांचा वापर करावा. यापेक्षा कमी उपद्रव असल्यास जैविक किडनाशके वापरावीत.
2.फक्त तज्ञांद्वारे, कृषिदर्शनी, पीक संरक्षण पुस्तिका व इतर विश्वासपात्र दैनिके, नियतकालिके याद्वारा शिफारस केलेली किडनाशके घ्यावीत.
3.. रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही व वनस्पतीचे विविध भाग खाणाऱ्या किडींसाठी स्पर्श व पोट विषे शिफारस केलेल्या मात्रेनुसार वापरावीत.
4. किडनाशकांच्या बाटल्या तथा पाकिटे खरेदी करतांना त्यावरील वापराची अंतिम तारीख बघून घ्यावी
5. आपणांस हवे असलेले किडनाशकाचे तांत्रिक नांव व त्याचे प्रमाण घटकात दिलेले आहे, याची खात्री करून घ्यावी. उदा. इमिडाक्लोप्रीड हे तांत्रिक नांव काँफिडॉर १७.८ टक्के एस.एल., टाटामिडा १७.८ टक्के एस.एल. इ. व्यापारी नावाने मिळत असले तरी प्रत्येक पॅकिंगवर घटकाखाली इमिडाक्लोप्रीड व त्याचे प्रमाण दर्शविलेले असते.
6.कोणत्याही तज्ञांकडे जाण्याअगोदर किडीचा नमुना, वापरलेल्या किडनाशकांची व्यापारी व तांत्रिक नावे, किडीच्या उपद्रवाचे प्रमाण अशी माहिती दिल्यास किड समस्यांवर योग्य शिफारस मिळते.
बाजारात उपलब्ध असलेली काही किटकनाशके
किटकनाशकांचे मिश्रण करताना शेवटच्या पानावरील मिश्रण तक्त्यानुसार मिश्रण करावे.
किटकनाशक कायदा आणि किटकनाशकांचा वापर
भारत सरकारने किटकनाशकांची आयात, निर्मिती, विक्री, वाहतुक, वितरण आणि किटकनाशकांच्या वापरावर नियंत्रणासाठी २ सप्टेंबर १९६८ रोजी देशात किटकनाशक कायदा लागू केला. या कायद्यांतर्गत राज्य व केंद्र सरकारला किटकनाशकांच्या वापराच्या निर्देशनांसाठी भारत सरकारने केंद्रीय किटकनाशक मंडळाची (CIB) स्थापना फरीदाबाद येथे केली. तसेच १९७१ साली किटकनाशकांच्या वापराविषयी नियम तयार केले.
विविध कंपन्यांना किटकनाशकांची नोंद सुरुवातीस केंद्रीय किटकनाशक मंडळाकडे करून, किटकनाशके शेतातील वापरासाठी परिणामकारक असल्याच्या चाचण्या विविध शास्त्रिय तथा वैज्ञानिक संस्थांकडून करून घेऊन त्यासंबंधीचे अहवाल केंद्रीय किटकनाशक मंडळास सादर करावे लागतात. केंद्रीय किटकनाशक मंडळाकडे नोंदणी होऊन बाजारात उपलब्ध झालेल्या किटकनाशकांच्या पाकिटासोबत असलेल्या घडीपत्रिकेत खालील तांत्रिक बाबींचा समावेश असतो.
१) किटकनाशकाचे तांत्रिक नाव (स्वरुपासहीत).
२) किटकनाशकाचे व्यापारी नाव (स्वरुपासहीत).
३) निर्माता कंपनीचे नाव.
४) किटकनाशकाची सर्वसाधारण माहिती.
५) रासायनिक संरचना .
६) शिफारशी (लेबल क्लेम).
विशिष्ट पिकावरील शिफारस केलेल्या किडींच्या नियंत्रणासाठी वापरावयाची शुध्द तांत्रिक मात्रा/हे., स्वरुपिय मात्रा/हे., फवारणीसाठी वापरावयाचे पाणी, शेवटची फवारणी व पिक काढणीपर्यंतचे आवश्यक असलेले दिवसांतील अंतर या गोष्टींचा समावेश होतो.
७) फवारणीसाठी वापरावयाची उपकरणे/औजारे.
८) वापरासंबंधी सुचना.
९) विषबाधेची लक्षणे.
१०) प्रथमोपचार.
११) विषबाधेवरील उतारा /उपचार .
१२) किटकनाशके साठवण्यासाठीच्या सुचना .
१३) किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या, खोकी इ.ची विल्हेवाट.
१४) दक्षता - किटकनाशक हाताळतांना घ्यावयाची काळजी.
किटकनाशके फवारतांना घडीपत्रिकेत दिलेल्या नोंदीतील मानेनुसारच (लेबल क्लेमनुसार) वापरावी. केंद्रीय किटकनाशक मंडळाकडे नोंद झालेल्या किटकनाशकांची यादी www.cibrc.nic.in या संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध आहे.