टोमॅटो साठवण
|
हवामान
टोमॅटो पीक जरी वर्षभर घेता येत असले तरी हवामानातील तापमानाचा विचार करुन पीक घेतले तर उत्पादनात निश्चित वाढ दिसुन येते. बियांची उगवण तसेच झाडांची वाढ १६ अंश ते २९ अंश सें.ग्रे. तापमानात चांगल्या प्रकारे होते. फळधारणेसाठी १८ अंश ते ३२ सें.ग्रे. तापमान फारच उपयुक्त आहे. तापमान ३२ अंश सें.ग्रे. वर गेल्यास फळधारणेवर अनिष्ठ परिणाम होतो.
जमीन
टोमॅटोचे पीक हलक्या ते भारी जमिनीत घेता येते. साधारणपणे हलक्या मुरमाड जमिनीत पीक लवकर तर भारी जमिनीत उशिरा येते. उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत चांगले येते. जमिनीचा सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा. टोमॅटो पिक ज्या जमिनीत घ्यावयाचे आहे त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत कारण त्यामुळे किड व रोगांचा जास्त प्रादर्भाव होतो.
सुधारित वाण
टोमॅटोमध्ये विविध वाण सरळप्रकार व संकरित प्रकारात उपलब्ध असतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी धनश्री व भाग्यश्री हे सरळ प्रकारामधील तर लांबच्या बाजारपेठेसाठी फुले राजा हे संकरित वाण प्रसारित केलेले आहेत. आणि अधिक बीटा कॅरोटीनयुक्त फुले केसरी हा वाण प्रसारित केलेला आहे. तसेच चेरी टोमॅटोचा फुले जयश्री हा वाण प्रसारीत केलेला आहे. त्याचप्रकारे खाजगी बियाणे संस्थेचे अनेक संकरित वाण बाजारात मिळू शकतात. टोमॅटोची लागवड ही तीनही हंगामात करता येते खरीप हंगामासाठी मे-जुन रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर व उन्हाळी हंगामासाठी जानेवारीफेब्रुवारी या महिन्यामध्ये बियाणाची पेरणी करावी.
रोपवाटिका
साधारणपणे सरळ जातीसाठी टोमॅटोचे ४०० ग्रॅम व संकरित जातीसाठी १२५ ग्रॅम बियाणे हेक्टरी पुरेसे होते. रोपवाटिका तयार करण्यासाठी ३ मीटर लांब, १ मीटर रुंद व १५ सें. मी. उंच या आकारमानाचे गादीवाफे तयार करावेत. वाफा चांगला भुसभुशीत करुन घोळून त्यातील दगड ढेकळे कचरा काढून टाकावे व प्रत्येक वाफ्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड व १००-१५० ग्रॅम सुफला मिसळून घ्यावा व वाफा सपाट करुन घ्यावा. चार बोटांच्या अंतरावर वाफ्याच्या रुंदीशी समांतर रेघा पाडाव्यात रेघा जास्त खोल नसाव्यात. अशा ओळींमध्ये बी पातळ पेरावे व हलक्या हाताने ते बी मातीने झाकून टाकावे. वाफ्याला बी उगवेपर्यंत शक्यतो झारीने पाणी द्यावे. त्यानंतर वाफ्याला पाटाने पाणी द्यावे टोमॅटोची रोपे हंगामानुसार ३ ते ५ आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात. लागवडीच्या ४ ते ५ दिवस अगोदर पाणी हळूहळू कमी करावे व लागवडीच्या आदल्या दिवशी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे.
१) बियाण्याची पेरणी झाल्यानंतर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ कापड मच्छरदाणीसारखे २ मीटर उंचीपर्यंत गादीवाफ्यास लावावे. त्यामुळे रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचा बंदोबस्त होईल.
२) गादीवाफ्यावर दोन रोपांच्या ओळीमध्ये जमिनीत कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून जिरवण करावी.
३) रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी रोप उगवल्यानंतर गादी वाफ्यावर ३ % कार्बोफ्युरॉन ३५ ते ५० ग्रॅम किंवा १० % फोरेट १० ते २० ग्रॅम ही किटकनाशके प्रति १० चौ. मी. या प्रमाणात दोन ओळींमध्ये टाकुन हलके पाणी द्यावे.
४) रोपवाटीकेतील रोग/किडीचे नियंत्रण करण्यासाठी मॅन्कोझेब किंवा कॅप्टन २० ग्रॅम अधिक डायमेथोएट ३० ई.सी. १० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात उगवण झाल्यापासुन दर १० दिवसाच्या अंतराने आलटून-पालटून २-३ वेळा फवारावे.
५) रोप प्रक्रिया : पुर्नलागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड १७.८ एस.एल. ५ मिली अधिक मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे १०-१५ मिनीटे बुडवावीत.
लागवडीचे अंतर
टोमॅटोच्या लागवडीचे अंतर साधारणत: बुटक्या ते मध्यम पसाऱ्याच्या जातीसाठी ७५ ते ९० सें. मी. सरी काढून लागवड ३० ते ४० सें. मी. वर करावी. उंच वाढणारे व अधिक पसारा असणाऱ्या वाणांसाठी ९० सें. मी. सरी काढून ३० सें.मी. वर लागवड करावी. अशाप्रकारे, खरीप हंगामासाठी जून-जुलै, रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर व उन्हाळी हंगामासाठी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवड करावी.
खतांचा वापर
माती परिक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापारावीत. टोमॅटो हे पीक रासायनिक तसेच जैविक खतांना चांगला प्रतिसाद देते. लागवडीसाठी क्षेत्र तयार करतांना चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी २० टन शेतामध्ये मिसळावे. रासायनिक खतांमध्ये सरळ जातीसाठी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश व संकरित वाणासाठी ३००:१५०:१५० किलो नत्रःस्फूरदःपालाश प्रति हेक्टरी वापरावे. त्या रासायनिक खतांपैकी निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर टाकावे तर उरलेल्या निम्म्या नत्राच्या ३ समान मात्रा २० दिवसाच्या अंतराने द्याव्यात. सुक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धता तपासून सुक्ष्म अन्नद्रव्य खते द्यावीत. खते टाकल्यावर ताबडतोब पाणी देणे जरूरीचे आहे. रोपांची लागवड वरंब्याच्या बगलेत, वाफ्यांना अगोदर पाणी देवून करावी. त्यावेळी रोपांची मुळे सरळ खाली राहतील याची काळजी घ्यावी.
आंतरमशागत व पाणी नियोजन
टोमॅटो पिकाला ३ ते ४ खुरपण्या देवून शेत तणमुक्त ठेवावे. रब्बी हंगामात साधारणपणे ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. तर उन्हाळी हंगामात ६ ते ८ दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामत पावसाच्या अंदाजानुसार पाणी द्यावे. पीक फुलोऱ्यात असतांना व फळांची वाढ होत असतांना पाण्याचा योग्य वापर करावा. दोन पाण्याच्या पाळ्यात मोठा खंड पडू देवू नये. अन्यथा फुलगळ व फळगळ किंवा फळे तडकणे हे धोके निर्माण होतात. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याची बचत होवून दर्जेदार फळे मिळतात व तणांचे प्रमाणही मर्यादित राहते. टोमॅटोची लागवड केल्यानंतर साधारणपणे १ ते १.५ महिन्यांनी वरंब्याची माती फोडून झाडांना भर द्यावी.
झाडांना आधार देणे
टोमॅटोची लागवड केल्यानंतर साधारणपणे १ ते १.५ महिन्यानंतर झाडांवर फळे वाढू लागल्यानंतर वजनामुळे झाडाच्या फांद्या जमिनीला टेकतात, काही फळांचा जमिनीशी संपर्क येतो. त्यामुळे झाडांवर किडी व रोगाचा प्रदुर्भाव होतो. फळे खराब होतात, वरच्या बाजूची फळे उघडी पडतात. यासाठी झाडांना वेळीच आधार देणे महत्वाचे आहे.
फळांची काढणी
लागवडीनंतर साधारणत: ६० ते ७५ दिवसांनी वाणांनुसार फळे काढणीस तयार होतात. बाजारपेठेचे अंतर व वाहतुकीचे साधन लक्षात घेवुन फळांची तोडणी करावी. लांबच्या बाजारपेठेसाठी डोळा पडण्यास सुरुवात झालेली फळे तोडावीत, तर जवळच्या बाजारपेठेसाठी गुलाबी रंगाची किंवा लाल रंगाची पक्व फळे तोडावीत. तोडलेली फळे सावलीत ठेवावीत व त्यांची बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्गवारी करावी. खराब, सडलेली, फुटलेली, दबलेली, फळे निवडून काढावीत. सध्या प्लॅस्टिक क्रेटस् ही वाहतुकीस खूप लोकप्रिय झालेले आहेत. टोमॅटोचे वाण, हंगाम, किडी व रोगांचे प्रमाणानुसार उत्पन्न मिळते. साधारणपणे सरळ जातींपासुन ३० ते ४० टन प्रति हेक्टरी तर संकरित वाणांपासून ५५ ते ६० टन प्रति हेक्टरी उत्पन्न मिळू शकते.
रोग व किड व्यवस्थापन
टोमॅटोवर भाजीपाला पिकांमधील जवळजवळ सर्व रोग व किडी आढळून येतात. त्यासाठी जर शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड नियंत्रण राबवले तर बऱ्यापैकी किडींचा बंदोबस्त करता येतो. टोमॅटोवर फुलकिडे, मावा, पांढरी माशी, कोळी, नाग अळी, फळ पोखरणारी अळी या किडींचा प्रार्दुभाव आढळून येतो.
मर
हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे झाडे अचानक वाळायला लागतात. झाड उपटले असता मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेतील रोपे मरगळलेली, माना पडलेली दिसतात. ट्रायकोडर्मा व्हीरीडी १.५ % डब्ल्यु.पी. २० ग्रॅम /कि.ग्रॅम. बियाण्यास बिज प्रक्रिया करावी.
विषाणूजन्य रोग
विषाणू रोगांमध्ये अनेक वेगवेगळे रोग आहेत. परंतु टोमॅटो या पिकावर प्रामुख्याने करपा (स्पॉटेड विल्ट व्हायरस) व पर्ण गुच्छ (लिफकर्ल व्हायरस) हे प्रमुख विषाणु रोग आढळतात. या रोगांची लागण अगदी रोपवाटिकेमधुन सुरुवातीपासुन होण्याची शक्यता असते. हे रोग अनुक्रमे फुलकिडे, पांढरी माशी या किडीमुळे प्रसार पावतात. त्यासाठी या किडींचा सुरवातीपासुनच बंदोबस्त केल्यास ह्या घातक रोगाचे प्रमाण कमी ठेवता येते. शेतामध्ये हे रोग आढळल्यास कमी प्रमाणात असतांनाच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या किडींच्या बंदोबस्तासाठी स्यान्ट्रॅनिलीप्रोल १०.२६% ओडी १८ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून आठवड्याच्या अंतराने साध्या हातपंपाने फवारण्या कराव्यात. रोपवाटीकेत सांगितल्याप्रमाणे उपाय करावेत.
नागअळी (लिफ मायनर)
ह्या किडीच्या अळ्या पानांच्या पापुद्रयात शिरुन मधील हिरवा भाग पोखरुन खातात. त्यामुळे पाने पांढरी पडतात व पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. यासाठी रोपे लागवड करतांना लागण झालेल्या रोपांची कीडग्रस्त पाने काढून टाकावीत. लागवडीनंतर नाग अळीचा प्रार्दुभाव दिसू लागताच ५% निबोळी अर्काची फवारणी करावी.
फळे पोखरणारी अळी
ही अळी प्रथम पाने खाते व नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरुन आत शिरते व गर खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ % ईसी २० मिली किंवा नोव्हॅलीरॉन १०% ईसी १५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५ % एस.सी.३ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन ८ ते १० दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. हेलीओथीस न्युक्लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एच. ए. एन पी. व्ही) विषाणू २०० मि. लि. प्रति २०० लिटर पाण्यातून संध्याकाळचे वेळी फवारावे.
उत्पादन
संकरीत ५५ ते ६० टन/हेक्टरी, सरळ वाण ३० ते ४० टन/हेक्टरी.