वरई बियाणे प्रमाण
|
महाराष्ट्रामध्ये वरी/वरई या पिकाचे लागवड प्रामुख्याने घाट व उपपर्वतीय विभागातील नाशिक, अकोले (अहमदनगर), नंदुरबार, पुणे, कोल्हापुर, सातारा, धुळे या जिल्ह्यांमध्ये तसेच कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये केली जाते. वरी या पिकाला काही भागामध्ये वरई/भगर असेही म्हटले जाते. हे पीक प्रामुख्याने उपवासाकरिता प्रमुख अन्न म्हणून खातात. याच बरोबर दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे वरई हे प्रमुख अन्न आहे.
वरी/वरई पिकाचे आहारातील महत्व
वरी पिकाला असणारे धार्मिक महत्व व त्याचबरोबर त्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास सत्वयुक्त धान्य म्हणणे योग्य ठरते. वरी धान्यात स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, खनिज व लोह या मुलद्रव्यांचे प्रमाण गहू आणि भात पिकापेक्षा चांगले आहे. उपवासाला वरीचा भात/भाकरी खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही. त्यामुळे वरी आरोग्यास लाभदायक आहे. वरीचा भात, भाकरी, बिस्किट, लाडू, शेवया, चकली, शेव इत्यादीमध्ये केला जातो.
हवामान
वरी/वरई पीक उष्ण व समशितोष्ण प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान २५०० मिमि. पर्यंत असणाऱ्या भागात समुद्र सपाटीपासून १००० ते १८०० मिटर उंचीपर्यंत घेतली जाते. या पिकाच्या वाढीसाठी कमाल २५० ते २७० से.ग्रे. तापमान पोषक असते.
जमीन
या पिकास हलक्या ते मध्यम मगदूराची पूर्ण निचऱ्याची व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असलेली जमिन योग्य आहे.
पूर्व मशागत
जमिनीची नांगरट उताराच्या आडव्या दिशेने करावी तसेच उतारानुसार ठराविक अंतरावर समतल चर किंवा समतल बांध काढावेत. नांगरणीनंतर हेक्टर १५ ते २० गाड्या शेणखत टाकून कुळवाच्या सहाय्याने मिसळून घ्यावे.
सुधारित जाती
वरी/वरई पिकाची महाराष्ट्र राज्यासाठी सुधारित फुले एकादशी या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे.
फुले एकादशी वाणाची ठळक वैशिष्ठये
* फुले एकादशी हा उशिरा पक्व होणारा (गरवा) वाण असून तो १२० ते १३० दिवसात काढणीस तयार होतो.
* हा वाण मध्यम वाढ होणारा असून न लोळणारा आहे.
* या वाणाची कणसे खाली वाकणारी, लांब आहेत.
* दाण्याचा रंग तांबूस चकाकी असणारा आहे.
* झाडाचे खोड जाड, गडद हिरव्या रंगाचे असून काढणीपर्यंत हिरवे राहते.
पेरणी
वरी/वरई पिकाची लागवड पेरणी, टोकण आणि रोप लागण पध्दतीने करण्यात येते.
बीजप्रक्रिया
वरईच्या एक किलो बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम थायरम किंवा फॉलीडॉल भुकटी लावावी. प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम ॲझोस्पीरिलम ब्रासिलेन्स आणि अॅस्परजिलस अवोमोरी या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे १० ते १५% उत्पादनात वाढ होते.
आंतरमशागत
कोळपणी करून जरूरीनुसार एक महिन्याच्या आत खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवावे.
खत व्यवस्थापन
४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरदची प्रति हेक्टरी मात्रा द्यावी. (युरिया ३५ किलो+सिंगल सुपर फॉस्पेट २० किलो/एकर) यापैकी अर्ध्या नत्राचा हप्ता व स्फुरद खताची संपूर्ण मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. राहिलेला नत्राचा अर्धा हप्ता पिक एक महिन्याचे झालेनंतर द्यावा. पश्चिम घाट विभागातील कमी डोंगर उतार असलेल्या (१ ते ३ टक्के) हलक्या जमिनीत पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी ६० किलो नत्र (अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व शेणखत मात्रा पुर्नलावणीच्या वेळी व अर्धे नत्र पुर्नलावणीनंतर २५ दिवसांनी), तसेच २० किलो स्फुरद व २० किलो पालाश आणि २ टन शेणखत /हेक्टरी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
पीक संरक्षण
पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पिकाची लागवड केल्यानंतर पावसामध्ये १२ ते १५ दिवसांचा खंड पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसतो. यासाठी प्रति किलो बियाण्यास किंवा इमिडाक्लोप्रीड ७०% प्रवाही १० मिली प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
काढणी व मळणी
पीक पक्व होताच पिकाची काढणी जमिनीलगत कापणी करून करावी. पिक वाळवल्यानंतर खळ्यावर कणसे कापून किंवा संपूर्ण पिक मळणीयंत्रातून मळणी करतात किंवा कणसे चांगली वाळवल्यानंतर बडवून मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात चांगले वाळवून हवेशिर जागेत साठवून करावी. पुढील वर्षाच्या बियाण्यासाठी चांगली भरलेली टपोरी दाण्याची किड व रोग विरहीत कणसे निवडून मळणी करून साठवण करावी.
उत्पादन
१० ते १२ क्विंटल/हे.