नाचणी आंतरपिके
|
आहाराच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. नाचणीमध्ये पौष्टीक घटकांबरोबरच चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असल्याने बद्धकोष्टता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यांवरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. नाचणीपासून भाकरी, माल्ट, नुडल्स, पापड, आंबील, इडली, बिस्कीटे यासारखे खाद्यपदार्थ तसेच लहान मुलांच्या खाद्यामध्ये नाचणी सत्वाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
जमीन
हलकी ते मध्यम, निचऱ्याची.
पूर्वमशागत
एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देवून ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत/कंपोस्ट खताची जरुरी नसते.
सुधारीत जाती
फुले नाचणी वाणाची ठळक वैशिष्ठये
१) फुले नाचणी उशीरा पक्व (गरवा) वाण असून तो ११५ ते १२० दिवसांत काढणीस तयार होते.
२) हा वाण लोंबीच्या मानेवरील करपा रोगास अति प्रतिकारक व पानावरील करपा रोगास प्रतिकारक आढळून आला आहे.
३) हा वाण ८० ते ८५ दिवसात फुलोऱ्यात येत असून तो उंच वाढणारा आहे.
४) या वाणाची झाडे सरळ वाढणारी, न लोळणारी तसेच पाने ठिपके विरहीत संपूर्ण गर्द हिरव्या रंगाचा आहेत.
पेरणीची पद्धत
टोकण, पेरणी, रोप लागण पद्धत, पेरणी अंतर : २२.५ सें.मी. x १० सें.मी. अंतरावर.
बियाणे
३-४ किलो प्रति हेक्टरी
बीजप्रक्रिया
१) पेरणीपूर्वी ३ ते ४ ग्रॅम थायरम प्रती किलो बियाण्यास.
२) प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अझोस्पिरिलम ब्रासिलेन्स आणि अॅस्परजिलस अवोमोरी या जिवाणू संवर्धकाची बिज प्रक्रिया करावी.
खतमात्रा
पेरणीच्यावेळी ३० किलो नत्र, ३० किलो स्फुरद प्रति हेक्टर आणि पेरणीनंतर ३० दिवसांनी ३० किलो नत्र. महाराष्ट्राच्या उपपर्वतीय विभागात नाचणीच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी प्रति हेक्टरी ५ टन शेणखत + नत्र ६० किलो, स्फुरद ३० किलो आणि पालाश ३० किलो या खत मात्रे सोबत जिवाणुसंवर्धनाची बीज प्रक्रिया (प्रति किलो बियाण्या प्रत्येकी २५ ग्रॅम ॲझोस्पिरिलम ब्रासिलेंध्स आणि अस्परजिलस अवामोरी) करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
नाचणी पिकामध्ये युरिया, डिएपी ब्रिकेटचा वापर
गादी वाफयावर रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुर्नलागण करताना रोप लागण २० x ४० सेंमी जोडओळ पध्दतीने करावी. दोन ओळीतील अंतर २० सेंमी. ठेवून शिफारशीत खत मात्रेच्या ७५ टक्के खत मात्रा ( नत्र ४५ किलो + स्फुरद २२.५ किलो प्रति हेक्टर) ब्रिकेट (गोळी) स्वरुपात दयावी. ब्रिकेट देताना २० सेंमी.च्या जोडओळीत ३५ सेंमी. अंतरावर ५ ते ७ सेंमी. खोलीवर २.७ ग्रॅमची १ ब्रिकेट (गोळी) दयावी.
आंतरमशागत
एक खुरपणी आणि दोन कोळपणी किंवा आयसोप्रोट्युरॉन ५० टक्के या तणनाशकाची प्रति हेक्टरी ७५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून पीक व तणे उगवणीपूर्वी फवारावे.
आंतरपिके
नाचणी पिकामध्ये नाचणी + सोयाबीन, नाचणी + उडीद किंवा नाचणी + मटकी या पिकाची ४:१ किंवा ८:२ या प्रमाणात घ्यावे.
पीक संरक्षण
१. लष्करी अळी व पाने खाणारी अळी : खरीपात ३० ते ८० टक्के नुकसान. गवताळ-डोंगरी भागात जास्त प्रादुर्भाव. या आळीच्या बंदोबस्तासाठी शेतातील/बांधावरील गवत काढून टाकावे.
२. मावा-तुडतुडे : प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात जास्त रस शोषून घेतात. कर्बग्रहण मंदावते.
काढणी
पीक पक्क होताच लवकरात लवकर पीकाची काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पीकाची काढणी बोंडे खुडून करावी. बोंडे चांगली वाळल्यानंतर बडवून मळणी करून उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करावी. पुढील वर्षाच्या बियाणासाठी चांगली भरलेली टपोऱ्या दाण्याची कीड व रोग विरहीत बोंडे निवडून मळणी करून साठवण करावी.
उत्पादन
हेक्टरी २० ते २५ क्विंटल.