भाजीपाल्याची लागवड करण्यापूर्वी दर्जेदार व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी तांत्रिक बाबींचा बारकाईने विचार करून सुयोग्य नियोजन करणे आवश्यक असते. उन्हाळी भाजीपाला करीत असताना त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवर्जुन करणे फारच गरजेचे असते. त्यामध्ये प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब व पाणी साठवून ठेवणारी, परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड, रोग व कीड प्रतिकारक चांगले दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातीची निवड, जमिनीवरील आच्छादनाचा वापर, कोरडे व उष्ण वारे यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड, पाण्याचे सूक्ष्म पद्धतीद्वारे (ठिबक किंवा फवारे) व्यवस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन, जादा पर्णगुच्छ असणाऱ्या जातींची निवड व त्याद्वारे फुलांचे व फळांचे उन्हापासून संरक्षण, फुलोऱ्यात संजीवकांचा वापर, रोपवाटिकेपासून ते फळधारणा होईपर्यंत रोग व किडींच्या संरक्षणासाठी जैविक व रासायनिक औषधांचे एकात्मिक नियोजन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लॅस्टिक जाळीचा (शेट नेट) वापर, पाण्याचा योग्य वापर - विशेषत: फुलोरा ते फळ काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा आणि तोसुद्धा पहाटे, सकाळी आणि संध्याकाळी व रात्रीच्या वेळी (भर उन्हात पाणी देणे टाळावे), फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी तसेच स्वच्छ ठिकाणी प्रतवारी व पॅकिंग, साठवण व योग्य वेळी मालवाहतुक (पहाटेच्या वेळी) या बाबींचा नियोजनपुर्वक एकत्रित वापर केल्यास उन्हाळी भाजीपाल्याची उत्तम प्रत साधून अधिक उत्पादन घेणे शक्य होईल व मालाची प्रत आणि उत्पादन यांची सांगड घातल्यामुळे उन्हाळी भाजीपाल्याची लागवड अधिक किफायतशीर होऊ शकेल.